आज दिनांक २९ डिसेंबर २००८ ला महाराष्ट्र टाईम्स मधे श्री. सुहास फडके यांचा हा लेख वाचा आणि विचार करा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3908155.cmsपाकिस्तानविरूद्ध युद्धज्वर निर्माण केल्यानंतर पुन्हा एकदा भारताने माघार घेतली आहे. असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याच दशकाच्या आरंभी , अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला चढवल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने , सीमेवर सैन्याची प्रचंड जमवाजमव केली. कोणत्या क्षणी भारत चढाई करणार असे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. पाकिस्तानच्या भारताच्या सार्वभौम अशा प्रतिकावर संसदेवर हल्ला करूनही आपण ते सहन केले. २६ नोव्हेंबर रोजी तर पाकिस्तानने , भारताविरूद्ध युद्धच पुकारले. ते अघोषित होते हाच काय तो फरक. चक्क दहा अतिरेक्यांनी , मुंबईत तीन दिवस लढाई केली. लष्करी अधिकारी , जवान , पोलिस अधिकारी आणि इतर पोलिस यांच्यासह देशी परदेशी सर्वसामान्य जन यांची हत्या केली. अनेक पोलिस जखमी झाले. लष्कराने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अतिरेक्यांना ठार मारले. एकजण जिवंत हाती लागला. या कसाबमुळे पाकिस्ताननेच हे युद्ध घडवून आणले यात कोणतीही शंका उरली नाही. आता भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानमध्ये लष्कर घुसवेल , लढाऊ विमाने पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे अड्डे नष्ट करतील अशी आशा अनेकांना वाटू लागली. कधी नव्हे ते , भारताने युद्ध पुकारु नये असा सुर आळवला नाही. अमेरिका , इंग्लंड या एरवी पाकिस्तानला जपणा-या देशांनाही पाकिस्तानची बाजू घेता येत नव्हती. सारे जग भारताच्या बाजूने होते. कारण मुस्लिम अतिरेक्यांचा फटका ब-याच देशांना बसला होता. मग पंतप्रधान मनमोहनसिंग , परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी , रिमोट कंट्रोलने सरकार चालवणा-या सोनिया गांधी , भावी पंतप्रधान आणि तरूणांचे आशास्थान असे वर्णन केलेले राहुल गांधी या सगळयांनी पाकिस्तानलवा कडक इशारा दिला. यात खेदाची बाब म्हणजे , पाकिस्तान निर्विवादपणे दोषी असूनही , पाकिस्तानचा आवाज जास्त होता. गिलानी , झरदारी आदी बॉसेस मंडळी , भारताला कसे चोख उत्तर देऊ , तालिबानवाले पाक सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून कसे लढतील वगैरे वर्णन येऊ लागले. भारताने काही हालचाल करेपर्यंत , पाकने सीमेवर लष्कर गोळा केले. लढाई झाली असती तर ती दोन्ही देशांना फार हानीकारक ठरली असती यात शंका नाही. पण अमेरिकेलाही पाकिस्तानने ब्लॅकमेल केले. लढाई झाली तर अफगाण सीमेवर अमेरिकेला मदत करणारे आपले सैनिक भारतीय सीमेवर आणावे लागेल. यामुळे तालिबानी अतिरेक्यांशी सुरू असलेल्या संघर्षाची धार बोथट होईल , अतिरेक्यांचे यामुळे फावेल वगैरे भीती दाखवून पाकने अमेरिका भारताला युद्धापासुन परावृत्त करेल अशी व्यवस्था केली. यामुळे , भारतात , भारतात अतिरेक्यांनी हल्ला चढवूनही भारताने माघार घेतली असे चित्र दिसले. कधी नव्हे ते भारतीयांच्या पदरी निराशा पडली. वास्तविक बघता मुंबईत अतिरेक्यांनी लढाई सुरू केली तेव्हाच भारताने लष्कराच जमवाजमव करून पाकिस्तानवर दबाव आणायला हवा होता. अतिरेकी तळ नष्ट करायचा चंग बांधायला हवा होता. आता अतिरेकी तळ नष्ट करू अशी भारत भाषा वापरतो ही बिनकामाची आहे. कारण पाकच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधून अतिरेक्यांनी तळ केव्हाच हलवले आहेत. पाकिस्तानने कारगिल ताब्यात घेण्याचे प्रयत्न १९९९साली केले तेव्हाही आपण कारगिल मुक्त करण्यापुरतेच आपले ऑपरेशन मर्यादित ठेवले. तेव्हाही पाकिस्तानने कागाळी केली होती आणि पकिस्तानला फारशी किंमत मोजावी लागली नाही. भारताने मात्र सहाशे जवान आणि अधिकारी गमावले. पाकने सौरभ कालिया या लष्करी अधिका-याची अत्यंत घृणास्पद पद्धतीने हत्या केली होती. अगदी औरंगझेबाने संभाजी महाराजांना मारले तसे. पण त्याचीही किंमत आपण पाकला मोजावी लावली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाक सतत आपल्या खोडया काढत आहे आणि आपण सबुरीने वागत आहोत. गेली पस्तीस वर्षे तर पाकने , काश्मीर , पंजाब सतत पेटत ठेवण्याचे प्रयत्न केले. हे दोन्ही प्रांत भारतात राखण्यासाठी आपल्याला बरीच किमत मोजावी लागली. हे अघोषित युद्ध पाकिस्तान खेळत असताना आपण मात्र , आम्ही काही कारवाई करत नाही हा आमचा दुबळेपणा समजू नका असा इशारा देण्यापलिकडे काही केले नाही. अपवाद १९७१ च्या निर्णायक युद्धाचा. बांगलादेश आपण तेव्हा स्वतंत्र केले. पण जेमतेम पाच वर्षांत बांगलादेश मुस्लीम देश बनला आणि पाकिस्तानने पुकारलेल्या अघोषित युद्धात पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला त्रास दिला आहे. आजच्या घटकेला पाकिस्तानी अतिरेकी बांगलादेशच्या सीमेवरून भारतात धाडले जातात. आसामसारख्या राज्यात बांगलादेशींना इतके आक्रमण केले आहे की आसाम येत्या दहा वर्षांत स्वतंत्र होऊ शकेल.भारतात बनावट नोटा आणण्यात बांगलादेशींचा मोठा वाटा आहे. भाभा अणुसंशोधन केंद , तेलकंपन्यांचे शुद्धीकरण कारखाने , आरसीएक , नौदलाचा तळ , विमानतळ या परिसराभोवती गेल्या दशकभरात पाकिस्तानी आणि बांगलादेशींनी विळखा घातला आहे.यापैकी किती शत्रूचे हस्तक आहेत आणि सीमेपलिकडून संदेश येताच ते येथे हैदोस घालतील याचाही थांगपत्ता नाही. त्यांना रोखावे असेही सरकारले वाटत नाही. उलट अनेकांना आपण मोफत घरे देतो , मतदार म्हणून त्यांना हक्क देतो. असे करणारा भारत हा बहुधा एकमेव देश असावा. शत्रूला आपण इतके प्रेमाने का वागवतो असा प्रश्न् आपल्यालाच पडत असेल. याचे एक प्रमुख कारण म्हणजे हा आपल्या संस्कृतीचा , हिंदु संस्कृतीचा दोष आहे. किमान पाच हजार वर्षांचा इतिहास असणाऱ्या या संस्कृतीत शत्रूचा समुळ नायनाट करावा हे वचनच आपण विसरलो आहोत. याचे आदर्श उदाहरण म्हणजे पृथ्विराज चौहान हा राजा. महमद घोरीला सतरा वेळा पराभूत करूनही राजाने त्याला जीवदान दिले. अठराव्यांदा बाजू उलटली आणि घोरीने चौहानला वर पाठवले. अशी अनेक उदाहरणे आहेत. औरंगझेबाने संभाजी राजेंना हालहाल करून मारले. त्याला पकडून नेले तेच मुळी उंटाच्या पाठीला टांगून. त्याने मुस्लीम धर्म स्वीकारायला नकार दिला तेव्हा त्यांच्या तोंडात गरम राखेचे तोबरे भरले. डोळे काढले आणि त्याचा मृतदेह फेकून दिला. याउलट आपण काश्मीरमध्ये भारतीय सैन्याशी लढताना मेलेल्या अतिरेक्यांचे सन्मानाने दफन केले. त्यांपैकी अनेक तर पाकिस्तानी नव्हते , ते अफगाण होते अरब होते. दुसरे असे की आपण युद्ध टाळण्याचे बघतो. भले आपण भगवदगीतेबद्दल भरभरून बोलत असलो तरी , समोरचा माणून भले आपला नातेवाईक असो , पण त्याक्षणी तो आपला शत्रू असतो आणि त्याला संपवणे हीच युद्धनीती असते. शत्रूला जीवदान दिल्याची किंमत फार मोठी मोजावी लागते हे आजही आपल्याला उमजलेले नाही. पाकिस्तानने गेल्या सहा दशकांत आपल्याला हा धडा शिकवण्याचा प्रयत्न केला , पण आपण अजूनही जुन्या कल्पनांना कवटाळून बसलो आहोत. यात आपण उद्वस्थ होऊ हेही आपल्या ला कळत नाही. याला अपवाद ठरला तो म्हणजे शिवाजी महाराज. मोगल , निजाम वगैरेंना पूर्ण शह दिल्याखेरीज स्वस्थ बसायचे नाही असा त्यांनी दृढनिश्चय केला होता. काही प्रमाणात पेशव्यांनी हा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला. पण हिंदुंमधील जातीय भेदाचा फटका त्यानांही बसला. १७६१च्या पानपत युद्धात पेशवे हे ब्राह्मण आणि सरदार बहुजन समाजाचे अशी फुट पडली. या शिवाय राजपूत , शिख यानीही मराठयांना शह देण्यासाठी परकी शत्रूला जवळ केले. हिंदु म्हणून एकजूट बांधण्याचे गेल्या काही दशकांत प्रयत्न केले ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने , पण , संघही आपल्या ठाशीव कल्पनांमधून बाहेर पडला नाही. त्यांचा सारा कार्यक्रम हा दीर्घकालीन चालणारा होता. शॉर्ट टर्मसाठी काही प्रभावी कार्यक्रम ते देऊ शकले नाहीत. संघात जातीभेद नाहीत असे ते म्हणतात , पण समाजाला जातीभेदाने ग्रासले असताना त्यावर उपाय ते देऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातपातविरहीत हिंदु धर्म उभारण्याची कल्पना मांडली , पण ते नेहमीच एकांडे शिलेदार राहीले. फार मोठे बळ ते आपल्यामागे उभे करू शकली नाहीत. त्यांच्या कार्यात , हिंदुंमधील जातपात नष्ट करण्याची त्यांची मोहीमही दुर्लक्षित राहीली. दलित समाजाच्या उद्धाराची भाषा करणाऱ्यांनाही सावरकरांच्या , हिंदुंच्या ऐक्याच्या मोहीमेच महत्त्व उमगले नाही. यात भर पडली ती , गेली हजारभर हिंदुस्थानावर झालेल्या आक्रमणाचा. लढाईतही नीती पाळण्याचा प्रयत्न करणारे हिंदु आणि युद्धात शत्रुला कायमचे संपवायचे असते , त्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारणारे आक्रमक या असमान लढाईत हिंदू पार गलीतगात्र झाले. याचेच प्रतिबिंब गेली सहा दशके पाकिस्तान आणि गेली तीस वर्षे बांगलादेश यांनी आपल्याला सतत त्रास देत असूनही , आपल्या सार्वभौमत्वाला आव्हान देत असूनही आपण निर्णायक पाऊल उचलू शकत नाही. पाकिस्तान विकलांग झाला तर आपल्याला अधिक त्रास होईल अशी एक भीती घातली जाते. तसे होईल तेव्हा निर्माण होणाऱ्या त्राासाला आम्ही त्यावेळी तोंड देऊ अशी आपण भूमिका घेऊ शकत नाही. सतत भीतीच्या छायेत आपण वावरत असतो. ही मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत पाकिस्तान आणि अनेक देश आपल्या उरावर बसणार यात शंका नाही.