रविवार, २ मार्च, २००८

बोला.

कवि स्व. श्री. सुरेश भट.

जगाशी फार सांभाळून बोला !
नको ते नेमके टाळून बोला !

इथे गुर्मीत बोला आमच्याशी
’तिथे’ लाजून, ढेपाळून बोला !

गळेकापू असो किंवा लफंगा,
पुढे येताच ऒवाळून बोला !

करा चर्चा दुज्यांच्या पातकांची
स्वत:ला तेवढे गाळून बोला !

तुम्ही देशात सैतानांप्रमाणे !
तुम्ही ’बाहेर’ संताळून बोला !

किती हो बोलण्याच्या गैरसोयी !
मुक्याने धोरणे पाळून बोला !

तुम्ही श्रिंगारूनी ठेवा असत्ये,
युगाचे सत्य फेटाळून बोला !

अम्हा सांगा नवी सूत्रे लुटीची
उपाशी झोपड्या जाळून बोला !

तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा,
तरीही आसवे ढाळून बोला !

झंझावात
कवि : सुरेश भट
प्रकाशक : साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर ४४० ०१२

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २००८

वॉर्ड नंबर पाच, केईएम.

डॉ. रवी बापट.

सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि किंग एडवर्ड मेमोरियल अर्थात केईएम रूग्णालय या दोन्ही एकमेकांशी संलग्न असलेल्या संस्था म्हणजे माझं कार्यमंदिर आहे. गेली ४५ - ४६ वर्ष मी या संस्थांशी निगडित आहे. पहिली साडेचार वर्ष विद्यार्थी म्हणून आणि नंतर प्राध्यापक म्हणून या संस्थांनीच माझी जडणघडण केली आहे. ज्ञान, अनुभव, व्यावसायिक कौशल्य इत्यादी गोष्टी या संस्थांनी मला भरभरून दिल्या आहेत . माझं व्यक्तिमत्व संमृध्द केले आहे. गेल्या जवळजवळ अर्धशतकाच्या काळात मी या संस्थांशी इतका एकरूप झालो आहे की त्या माझ्या व्यक्तिमत्वाचं अविभाज्य अंगच बनल्या आहेत. माझा एक मित्र तर म्हणतो, " रवीचं रक्त कधीही तपासा, त्याच्या धमन्यातून फक्त ’केईएम’च वाहत असतं !" माझ्या सर्वोच्च निष्ठा या कार्यमंदिराच्या ठायीच एकवटल्या आहेत हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो. या दोन्ही संस्थांचा इतिहास मोठा रंजक आणि राष्ट्रभावनेनं प्रेरित आहे.

डॉ. रवी बापट यांचे अनुभवकथन
वॉर्ड नंबर पाच, केईएम
शब्दांकन : सुनीति जैन.
रोहन प्रकाशन.

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २००८

बाप.

"आपला बाप जर निव्वळ पैशाच्या मागे लागल्यामुळे आपल्या वाट्याला येत नसेल तर मुलं बापाचा द्वेष करतात. पण त्याच्या व्यवसायाबद्दल त्यांना फारसा राग येत नाही. ह्याच्या अगदी उलट, त्यांच्या बापाच्या वृत्ती पैशाबाबत उदासीन असतील आणि व्यवसाय हा जर त्याचा धर्म बनला असेल तर मुलांना व्यवसायाचा राग येतो, पण बापाबद्दल नितांत आदर असतो."

पुस्तक: वपुर्झा
लेखक : व. पु. काळे.
प्रकाशक : मेनका प्रकाशन, पुणे - ३०