सोमवार, १७ मार्च, २००८

देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक.

जिम कॉर्बेट

हिमालय पर्वताराजीच्या वरच्या अंगाच्या विरळ वस्तीच्या प्रदेशात राहणार्‍या लोकांच्या मनावर अंधश्रद्धांचा केवढा पगडा आहे याची कल्पना, तिथं कधिही न राहिलेल्या लोकांना येणं शक्य नाही. मात्र या अती उंच पर्वतरांगांमध्ये राहणार्‍या साध्यासुध्या निरक्षर गावकर्‍यांच्या अंधश्रद्धा आणि कमी उंचीवर राहणार्‍या सुशिक्षित नि सुसंस्कृत लोकांच्या श्रद्धा यांच्यातील सीमारेषा फारच अस्पष्ट आहे. यांच्या श्रद्धांचा प्रदेश कुठं संपतो नि त्यांच्या अंधश्रद्धांचा कुठं सुरू होतो हे ठरवणं कठीण ...................

देवळाचा वाघ आणि कुमाऊंचे आणखी काही नरभक्षक.
जिम कॉर्बेट
अनुवाद : शरच्चंद्र बडोदेकर
OXFORD University Press.

मंगळवार, ११ मार्च, २००८

भगीरथाचे वारस.

पाऊलखुणा
सांगली जिल्ह्यामधलं रांजणी गाव. या गावातला घरटी एक माणूस लष्करात जातो, याचा रांजणीकरांना अभिमान. ही परंपरा राखणारे बळवंतराव उर्फ नानासाहेब साळुंखे याच गावातले. ते शिपायापासून चढत चढत सुभेदार पदापर्यंत पोहोचले आणि १९४७-४८ साली लष्करी सेवेतून निवृत्त झाले. पुढं वर्षभरातच पोलीसखात्यात हवालदार म्हणून रुजू झाले.
नानासाहेब साळुंख्यांचं पहिलं अपत्य विलास्राव साळुंखे. जन्म २० फेब्रुवारी १९३७ चा. नानासाहेबांच्या बदलीच्या नोकरीमुळं विलासरावांचं प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. माध्यमिक शिक्षणाची काही वर्षं बेळगाव - सांगलीला, तर उरलेली सोलापुरला झाली.
भगीरथाचे वारस.
"पाणी पंचायती"चे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांच चरित्र.
वीणा गवाणकर
राजहंस प्रकाशन

रविवार, ९ मार्च, २००८

गोष्टी माणसांच्या.

सुधा मुर्ती
लाल भाताची कणगी


माझ्या समाजकार्याच्या निमित्ताने एक गोष्ट आता माझ्या लक्षात आली आहे. अशा आपत्तीनंतर अनेक लोकांची आर्थिक अथवा अन्य काही स्वरूपाची मदत करण्याची इच्छा असते. श्रीमंत लोक जास्त देणगी देत असतील, असा आपला समज असतो; पण ते तितकंसं खरं नाही. त्याउलट मध्यमवर्गीय व कनिष्ठ मध्यमवर्गीय लोकच सढळ हाताने मदत करतात.

गोष्टी माणसांच्या.
सुधा मूर्ती.
अनुवाद : लीना सोहोनी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस.

शुक्रवार, ७ मार्च, २००८

खरे खुरे आयडॉल्स

प्रस्तुत पुस्तक हे एका अर्थाने महाराष्ट्राने कार्यरत मंडळींना केलेला सलाम आहे. शहरी ग्रामीण अशा दोन्ही विभागांतील आणि पाणी - जमीन - पर्यावरण - शेती - आरोग्य - शिक्षण - ग्रामविकास - आर्थिक सक्षमीकरण - अंधश्रध्दा निर्मूलन अशा अनेक क्षेत्रात ज्यांनी महत्वाचं आणि पथदर्शक काम उभं केलं आहे, त्यांना केलेला हा सलाम आहे. आजच्या आणि उद्याच्या महाराष्ट्रासाठी या प्रयोग - प्रयत्नाचं मोल मोठं आहे. आपल्या देशात माहितीक्रांतीचा बराच गवगवा होत असला, तरी लोकांच्या माथी फिजूल माहिती मारण्याचा प्रकारच अधिक आहे. जगात कुठे खुट्ट झालं तर पुढच्या क्षणी त्याचा साद्यंत वृतांत ऎकायला - पहायला मिळतो, परंतु शेजारच्या तालुक्यातील माहिती मिळायची मात्र मारामार असते. या पुस्तकातील काही कामं महाराष्ट्राला माहित असली तरी काही कामं अशीच आहेत, जी माहीत असायला हवीत. त्याप्रकारचे प्रयत्न महाराष्ट्रात गावॊगावी व्हायला हवे.

: खरे खुरे आयडॉल्स
युनिक फीचर्स
संपादक : सुहास कुलकर्णी
प्रकाशक : समकालीन प्रकाशन, ८, अमित कॉम्प्लेक्स,
४७४, सदाशिव पेठ, पुणे ०३०.

रविवार, २ मार्च, २००८

बोला.

कवि स्व. श्री. सुरेश भट.

जगाशी फार सांभाळून बोला !
नको ते नेमके टाळून बोला !

इथे गुर्मीत बोला आमच्याशी
’तिथे’ लाजून, ढेपाळून बोला !

गळेकापू असो किंवा लफंगा,
पुढे येताच ऒवाळून बोला !

करा चर्चा दुज्यांच्या पातकांची
स्वत:ला तेवढे गाळून बोला !

तुम्ही देशात सैतानांप्रमाणे !
तुम्ही ’बाहेर’ संताळून बोला !

किती हो बोलण्याच्या गैरसोयी !
मुक्याने धोरणे पाळून बोला !

तुम्ही श्रिंगारूनी ठेवा असत्ये,
युगाचे सत्य फेटाळून बोला !

अम्हा सांगा नवी सूत्रे लुटीची
उपाशी झोपड्या जाळून बोला !

तुम्ही घ्या प्राण एकेका पिढीचा,
तरीही आसवे ढाळून बोला !

झंझावात
कवि : सुरेश भट
प्रकाशक : साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपूर ४४० ०१२